Home > मराठी वांङमय मंडळ
Sies (Nerul) महाविद्यालयामध्ये २०१७ साली मराठी वांङमय मंडळाची स्थापना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मिलिंद वैद्य यांच्या पुढाकाराने झाली. या मंडळाची स्थापना मुलांमध्ये मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणे, मराठी भाषेमधील साहित्याची ओळख करून देणे व मराठी वांङमयातील वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची ओळख करून देणे हा मुख्य हेतू डोळ्यापुढे ठेवून करण्यात आली आणि त्यादृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम राबवले गेले. यामध्ये बाहेरचे मान्यवर आतिथी आमंत्रित केले गेले. या मध्ये महत्त्वाचा कार्यक्रम जो झाला होता त्याच नाव होतं "श्रावण रंग". हा आम्ही वर्षाच्या सुरवातीलाच केला होता. या कार्यक्रमामध्ये वर्षातील वेगवेगळ्या उपक्रमांची सुरवात आम्ही केली होती आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांना आमंत्रित केलं होतं. यादिवशी मुलांनी श्रावणमासावर आधारित कविता, गायन, लेख, एकपात्री अभिनय यांचं सादरीकरण केलं होतं. तसेच सुप्रसिद्ध कवी श्री. अरुण म्हात्रे यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामधून त्यांनी मुलांना मराठी बद्दल मराठी भाषेबद्दल बरीच माहिती दिली. मुलांमध्ये मराठी भाषेबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे हे ही सांगितलं. हे आणि असे बरेच कार्यक्रम मराठी वांङमय मंडळाने राबवले आहेत. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम जो दरवर्षी साजरा केला जातो तो म्हणजे मराठी खाद्यसंस्कृती. आता या खाद्यसंस्कृती मध्ये आपले जे मराठी पारंपरिक खाद्य पदार्थ आहेत उदाहरणार्थ पुरणपोळी, आळुवडी, कोथिंबीर वडी, ठेचा, झुणका भाकरी, सोलकढी, मिसळ पाव, चिक्की हे आणि असे बरेच मराठी पदार्थ विद्यार्थी स्वतः बनवून त्याची प्रदर्शन व विक्री करतात आणि ह्याला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील पाककला व व्यवस्थापन हे गुण वाढण्यास मदत होते. त्यानंतर मराठी वांङमय मंडळाच्या माध्यमातून रांगोळीचही प्रदर्शन भरविले जाते. ज्यामध्ये वेगवेगळ्या रांगोळ्यांना बक्षीस देण्यात येते. तसेच मुलांनी स्वतः केलेल्या कवितांचेही वाचन होते. मराठी भाषेचा अभिमान बाळगून छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती दर वर्षी १९ फेब्रुवारीला खूप उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी शिवदुर्ग प्रतिष्ठान ला बोलवून, शिवाजी महाराजांच्या सर्व गड- किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते व मुलांना सर्व गड-किल्ल्यांची माहिती दिली जाते. तसेच काही दुर्गवीर शिवभक्तांना बोलवून वेगवेगळ्या शिवकालीन हत्यारांची ओळख व ते चालवण्याची कला अवगत करून दिली जाते. हा ही एक कार्यक्रम असा असतो की जो विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खूप आवडतो. त्याबरोबरच दीड दिवसाचा गणेशोत्सव देखील महाविद्यालयात खूप उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थी गणपती बाप्पाची खूप मनोभावे पूजा करतात व उत्साहात पारंपारिक वेशात मिरवणूक देखील काढतात. त्यामार्फत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने विविध पर्यावरण पूरक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमुळे मुलांमध्ये एक धार्मिक भक्तिभाव जागृत होण्यास मदत होते. विद्यार्थी स्वतः सर्व वाद्ये वाजवून बाप्पासमोर विविध भजने सादर करतात. बाप्पाची आरती देखील खूप भक्तीभावाने करतात व प्रसाद स्वतः हाताने बनवून त्याचे सर्वांना वाटप करतात. आधी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ कविवर्य श्री अरुण म्हात्रे हे आमच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आले होते. वर्षाची जी सुरुवात झाली होती ती कवी अरुण म्हात्रे यांच्या कार्यक्रमाने झाली होती आणि तसेच आम्ही प्रसिद्ध कलावंत नकुल घाणेकर यांनाही आमंत्रित केले होते. त्यांच्याही मुलाखतीला मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यांनीही नृत्याबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं होत आणि त्यांनी नृत्य सादर ही केले होते तसेच त्यांनी मराठी भाषेसाठी काय करता येईल हे देखील सांगितले. आम्ही कवी मंदार आपटे यांना देखील आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भाषा कशी सुधारावी, भाषेचं ज्ञान कसं वाढवावं, कसं लिखाण करावं याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण देखील केले. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीचे आयोजन करण्यात येते. पंढरपूरच्या दिंडी प्रमाणे कॉलेज व कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरात दिंडी काढली जाते आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या दिंडी मध्ये फक्त मराठीच नाही तर मराठेतर मुलंही सहभागी होतात व मराठी भजने देखील गातात. मंडळात सहभागी झालेले गैरमराठी विद्यार्थी मराठी बोलण्याचा जो उत्स्फूर्त प्रयत्न करतात ते बघून खूप समाधान वाटते. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रीयन लोकांची भाषा आहे असे नाही तर महाराष्ट्रात राहणारा कोणताही माणूस मराठी बद्दल तेवढेच प्रेम व्यक्त करतो हे यात दिसून येते. मराठी वांग्मय मंडळाचं सर्वात मोठं आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषा दिनाचे आयोजन. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने कविता वाचन, एकपात्री अभिनय, निबंध, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व इत्यादी स्पर्धा दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन पातळीवर आयोजित केल्या जातात. त्यासाठी विविध कवी लेखक इत्यादी मान्यवरांना पाहुणे म्हणून पाचारण केले जाते. पण या करोना काळामुळे गेल्या दोन वर्षात हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले. मराठी भाषा दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रंथदिंडी. विद्यार्थ्यांना संत वांग्मय व मराठी भाषेतील विविध साहित्य यांची ओळख होण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी पारंपरिक वेषामध्ये म्हणजेच मुख्यतः मुली संपूर्ण मराठी साजशृंगार सहित नऊवारी साड्या तसेच मुले धोतर, झब्बा, पगड्या, टोपी असे एकदम पारंपरिक वेष परिधान करून लेझीमचे व विविध मराठी नृत्य प्रकारांचे सादरीकरण करतात व महाविद्यालयाच्या पूर्ण परिसरामध्ये फिरून मराठी संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवितात. त्यानंतर विद्यार्थी विविध संतांनी लिहिलेले भारुड, पोवाडा व इतर संतकाव्य सादर करून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी आयोजित केलेल्या या विविध कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादातून अजून नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्याचे मंडळाला प्रोत्साहन मिळते. यावर्षी कोरोना काळातदेखील मराठी प्रश्नमंजुषा, निबंध, कविता वाचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व त्याला देखील विद्यार्थ्यांचा खूप प्रतिसाद मिळाला. या काळात विद्यार्थ्यांनी देखील आम्हाला खूप नवीन नवीन कल्पना दिल्या त्यामुळे शिक्षक वृंदांनाही अस वाटत राहायचं की आपण काहीतरी वेगळं करावं जेणेकरून विद्यार्थ्यांनाही त्याच्यातून आनंद मिळेल व शिकायलाही मिळेल. विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या काही नवीन कल्पना देखील मराठी वाड्मय मंडळाने प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला आणि तो सफलही झाला.

VIEW PHOTO GALLERY

Important Links

© 2024 SIES(Nerul) College of Arts, Science and Commerce (Autonomous). All Rights Reserved.
TOP